मुंबई – भायखळा येथील राणीच्या बागेत ऑक्टोबर महिन्यात 1.70 लाख पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बाग (Rani bag) प्रशासनाच्या तिजोरीत 69 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. तर 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत 37 हजार पर्यटकांनी भेट दिली असून 15 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच सव्वा महिन्यात राणी बागेला 2 लाख 8 हजार पर्यटकांनी भेटी दिल्या असून एकूण 85 लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. (Mumbai News)
यासंदर्भातील माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी (Sanjay Tripathi) यांनी दिली आहे. मुंबईत स्थानिक, देशी, विदेशी पर्यटक चौपाटया, गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटा लेणी, नॅशनल पार्क, राणी बाग, नेहरू तारांगण, सीएसएमटी रेल्वे स्थानक, राणीचा रत्नहार, हाजी अली, क्रॉफर्ड मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आदी ठिकाणी आवर्जून भेटी देतात.
मात्र पूर्वीची राणीची बाग व आताची राणीची बाग यात खूपच फरक आहे. आता राणीच्या बागेत प्राणी, पक्षी याबरोबरच पेंग्विन, वाघांची (नर-मादी आणि बछडे) जोडी असे काही नवीन प्राणीही दाखल झाले आहेत.
राणी बागेचे आधुनिकीकरण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे “झू पार्क’ बनविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून काम चालू आहे. त्यातही पर्यटक मात्र राणीच्या बागेत गर्दी करीत आहेत. सध्या शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी पडलेली असल्याने ते आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने राणीच्या बागेत हजेरी लावत आहेत.