पुणे – मर्चंट नेव्हीतील एका तरुणाचे पनवेलमधून अपहरण करुन धनकवडीमधील लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यानंतर त्याच्या वडिलांकडे दोन लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान अपहरण झालेल्या तरुणाने वडिलांना व्हॉटसअपवर लोकेशन पाठवले होते. त्यानूसार पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक एकने त्याची सुटका केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अभिजीत राजेंद्र थोरात (20,रा. कर्जत अहमदनर), निखील रमेश कांबळे (31,रा.दत्तनगर कात्रज), प्रथमेश अनिल पाटील (22,रा. पंढरपूर,जि. सोलापूर) व एक विधीसंघर्षीत बालक आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंदखेड राजा धुळे येथील 25 वर्षीय तरुणाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा मर्चेट नेव्हीत नोकरी करतो. मार्च 2023 मध्ये तो मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जयपुर येथील खासगी प्रशिक्षण केंद्रात गेला होता. त्यावेळी तेथे हे चौघे आरोपी देखील आले होते. ते 45 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आपल्या घरी परत गेले होते. दरम्यान जामनगर गुजरात येथील राहुल सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी तरुणाचे नोकरीचे काम करून दिले. त्यानुसार तो गुजरात कांडलापोट येथे नोकरील लागला. त्याने आपले फोटो सोशल मिडीयावर टाकले होते. त्यावेळी अभिजीत थोरात याने तरुणासोबत संपर्क केला.त्याने कसे जॉइनिंग केले अशी विचारणा केली. तेव्हा तरुणाने सिंग याचा संपर्क क्रमांक दिला.पुढे थोरात आणि त्याच्या साथीदारांनी परस्पर सिंग याच्यासोबत संपर्क करून अडीच ते तीन लाख रुपये दिले. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. यामुळे फिर्यादी तरुणाने आपली फसवणूक केली असा, त्यांचा समज झाला. त्यांनी 29 जुलै रोजी फिर्यादीशी संपर्क साधला. तेव्हा धुळे येथे निघाला होता.
निखील कांबळे आणि त्याच्या साथीदाराने त्याच्याशी संपर्क करून पनवेल कळंबोली येथे त्याला गाठले. अभिजीत थोरात याला भेटण्याच्या बहाण्याने फिर्यादीला धनकवडी येथील एका लॉजवर नेण्यात आले. तेथे सर्व आरोपी एकत्र भेटले. त्यांनी फिर्यादीला तुझ्यामुळे आमचे सिंगकडे पैसे अडकले आहेत असा जाब विचार शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी तो ओरडून सांगत होता की मला काही माहिती नाही,आपण हवे तर गुजरात येथे जावून त्याला भेटू मात्र त्याचे कोणीच ऐकूण घेतले नाही. दरम्यान आरोपींनी फिर्यादी तरुणाच्या वडीलांना फोन करून त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत अडीच लाखांच्या खंडणीची मागणी केली. चेक आणि फोन पेद्वारे आरोपींनी तरुणाच्या बॅंक खात्यातून 90 हजार रुपये काढून घेतले. आरोपी बाहेर गेलेल्या संधीचा फायदा घेत तरुणाने मोबाईलवरून आपल्या वडीलांना ही माहिती देत लोकेशन शेअर केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, अंमलदार सचिन अहिवळे, प्रविण ढमाळ, सुरेंद्र जगदाळे, सौदोबा भोजराव, राजेंद्र लांडगे , अमर पवार, पवण भोसले, नितीन कांबळे, दुर्याधन गुरव, विजय कांबळे यांच्या पथकाने केली.