सीएनजीच्या किमतीत वाढ : खिशाला भुर्दंड
प्रतीकिलो सीएनजीची 87 रुपये
मंचर – गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल-डीझेल गॅससह सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात वाहनासाठी वितरीत केलेल्या सीएनजीची किंमत वाढून 87 रुपये प्रतीकिलो झाली आहे. रोजच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांना महागाईचा फटका बसत असून, वाहनचालकही आता “गॅस’वर गेले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीमध्ये तब्बल 18 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे वाहन चालकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या सततच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. काही महिन्यांपूर्वी सीएनजीचा दर 62.20 रुपये प्रतिकिलो होता, तो आज 87 रुपये झाला आहे. दोन महिन्यात सुमारे 18 रुपयांनी वाढ झाली आहे. ही भाववाढ पेट्रोल-डिझेलपेक्षा अधिक आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बहुतांश गाड्या पेट्रोलवरून सीएनजीमध्ये आणण्यात आल्या. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त पडते, असे सांगितले जाते; पण आता सीएनजी दरात देखील वाढ होऊन 87 रुपयांपर्यत पोहचला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसत आहे.
बऱ्याच वेळा रांगेत थांबूनही गॅस संपल्यावर वाहन चालकांना गॅसविनाच वाहन घरी आणावे लागत आहे.सीएनजी मिळत नसल्यामुळे वाहन चालकावर वाहन काही काळ बंद ठेवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे सीएनजीचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही भरमसाठ वाढ होत असल्याने महिला गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.
आंबेगाव तालुक्यात चारच पंप
आंबेगाव तालुक्यात मंचर, घोडेगाव, एकलहरे व पेठ येथे सीएनजी पंप आहेत; पण या चारही पंपांवर गॅस भरण्यासाठी वाहन चालकांची धावपळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सीएनजी पंपावर गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही, त्यामुळे गॅसअभावी अनेकदा पंप बंद आहेत. ज्या पंपावर गॅस उपलब्ध होत आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी सीएनजीचा दर कमी होता, यामुळे सर्वसामान्य लोकांचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण होत होते; परंतु सध्या गॅसच्या दरवाढीने आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता गाडी वापरणे जिकरीचे झाले आहे.
– विकास कानडे, सीएनजी वाहनधारक, कळंब