मुंबई – नोटबंदीच्या निर्णयानंतर आता एक आणखी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयानुसार २ हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांना त्या बँकेमध्ये जाऊन जमा करण्याची मुभा देण्यात येणार आहे. यासाठीची अखेरची मुदत ३० सप्टेंबर २०२३ असणार आहे.
याबाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता २ हजार रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जमा कराव्या लागणार आहेत.
नोटबंदीनंतर बाजारात आलेली २ हजारांची नोट –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर २ हजारांची चलनी नोट बाजारात आणण्यात आली होती. यापूर्वी १ हजार रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्याची नोट होती.
२ हजारांची नोट व्यवहारातून बाद होणार आहे का?
तर याच उत्तर नाही असं आहे. २ हजारांची न व्यवहारातून बाद करण्यात आलेली नाहीये. आरबीआयने क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत ही नोट यापुढे छापणार नसल्याचं म्हटलंय. यासोबतच २ हजारांची नोट ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घ्या अशी सूचनाही आरबीआयने दिली आहे. मात्र चलन म्हणून ही नोट यापुढेही वापरता येईल असं आरबीआय सांगतं.
नोटा बदलून मिळणार –
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बँक खात्यावर जमा करून अथवा बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध असणार असल्याचे जाहीर केले आहे. एकावेळी २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजारांच्या नोटा बदलून घेता येतील असेही बँकेतर्फे सांगण्यात आले आहे. ही सुविधा २३ मे पासून सुरु करण्यात येईल.
२ हजारांच्या नोटेवर अनेक आक्षेप –
केंद्रातील मोदी सरकारने, भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम उघडत असल्याचे सांगत नोटबंदीचा निर्णय घेतला होता. नोटबंदीनंतर २ हजारांचे चलन बाजारात आणण्यात आले होते. २ हजारांचे चलन बाजारात आणल्याने काळा पैसा लपवण्यास आणखीनच मदत होईल अशा प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या.
जीपीएस, लोकेशन ट्रॅकिंग आणि बरेच दावे –
नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात आलेल्या नव्या चलनी नोटांमध्ये चिप बसवण्यात आलेली असेल, यामुळे काळा पैसा लपवून ठेवणाऱ्यांचे लोकेशन हाती लागेल असे अनेक दावे करण्यात आले होते. मात्र नव्या चलनी नोटा बाजारात आल्यानंतर या दाव्यांमधली हवाच निघाली होती.