श्रीरामपूर – श्रीरामपूरमध्ये बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली. मात्र, तिघांची ही युती सभापती निवडीपर्यंत टिकली नाही. उपसभापती विखे गटाचे अभिषेक खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, सभापतीपदावर तिन्ही गटाचे एकमत झाले नाही.
निवड प्रक्रियेत मुरकुटे गटाने सभात्याग करीत तटस्थ भूमिका घेतली. सभागृहात उपस्थितीत संचालकांचे मतदान घेण्यात आले. ससाणे गटाकडून सुधीर नवले, तर विखे गटाकडून गिरीधर आसने सभापतिपदासाठी उमेदवार होते. दोघांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. त्यात सुधीर नवले यांना ईश्वरी कौल मिळाल्याने सभापतीपदी त्यांची निवड झाली.
सभापती निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला अपयश आले. विजयाचे पक्के गणित बांधले असताना एक संचालक कोण फुटला? यावर निवडीनंतर खल सुरू झाला. सभापती आणि उपसभपती ही दोन्ही पदे बेलापूर गावाला मिळाली. मात्र, दोघेही एकमेकांच्या विरोधी राजकीय गटातील असल्याने बेलापुरातील संघर्ष आता श्रीरामपूर बाजार समितीत असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सभापती निवडीवरून विखे-ससाणे-मुरकुटे युतीत वितुष्ट निर्माण झाले आहे. निवडीच्या वेळी मुरकुटे गटाने सभात्याग केला होता.