पुणे – शहरातील नदी तसेच प्रमुख तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात थेट सांडपाणी येत असल्याने मुठा नदीसह शहरातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत असतानाच महापालिकेच्या जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा संपली आहे. परिणामी, नदीसह, तलवांमध्ये जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर, महापालिकेचे अंदाजपत्रक एक एप्रिलपासून लागू होणार असल्याने तसेच या वर्षीपासून जलपर्णी काढण्याचे काम कोणतेही तांत्रिक बाबींचे अनुभव असलेले मनुष्यबळ नसलेल्या पर्यावरण विभागाकडे देण्यात आल्याने पावसाळ्यापर्यंत पुणेकरांना जलपर्णीचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
शहरातील नदीपात्र तसेच तलावातील जलपर्णी काढण्यासाठी 2022-23 च्या सुमारे दीड कोटींच्या निधीची तरतूद होती. त्यातून महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने 31 मार्च 2023 पर्यंतच्या मुदतीची निविदा काढली होती. प्रत्यक्षात हे काम जून 2023 पर्यंत होणे अपेक्षित असताना निधीचे कारण पुढे करत हा घाट घालण्यात आला. तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संबंधित काम देण्यात आलेल्या ठेकेदाराने 40 ते 45 टक्केच जलपर्णी काढली होती. त्यामुळे निविदांमधून काम होण्याची शक्यता धुसर होती. त्यातच, आता या वर्षीपासून हे काम पर्यावरण विभागाकडे देण्यात आले असून, त्याची निविदा हाच विभाग काढणार आहे.
त्यासाठी अंदाजपत्रकात नदी आणि प्रत्येक तलावासाठी वेगळी तरतूद करण्यात आली असून, जवळपास साडेचार कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, अंदाजपत्रक 1 एप्रिलला लागू होणार असून, त्यानंतरच निविदा काढली जाईल. परिणामी, निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होण्यास महिनाभराचा कालावधी गेला तरी सर्व तलाव आणि नदीपात्र जलपर्णीने भरून जाण्याची भीती असून, याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागणार आहे.