– सुनील राऊत
पुणे – अंगणवाडीपासून अंतरीक्षापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सावित्रीच्या लेकी आता पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातही पाऊल ठेवणार आहेत. अंगार फुलविणारी नारीच आजवर या दलापासून कोसो दूर होती; मात्र आता तिच या दलात सहभागी होऊन आगीशी दोन होत करणार आहे. दलाच्या स्थापनेपासून या विभागात आतापर्यंत एकही महिला कर्मचारी कार्यरत नव्हती. मात्र, आता फायरमन म्हणून 60 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
अग्निशमन दलाकडून फायरमनची 200 पदे भरली जाणार असून, त्यात 30 टक्के म्हणजे 60 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. ज्या महात्मा जोतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या महात्मा फुलेंच्या स्मारकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या अग्निशमन दलात स्थापनेपासून एकही महिला कर्मचारी भरती करण्यात आलेली नसल्याची बाब दैनिक “प्रभात’ने 12 जून 2022 रोजी “येथे महिलांचे अस्तित्वच उणे’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली होती.
या वृत्ताची दखल घेत राज्य महिला आयोगाने महापालिकेस पत्र पाठवित स्थापनेपासून किती महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, किती महिला कार्यरत आहेत, अग्निशमन दलात किती पदे रिक्त आहेत, या प्रश्नांची उत्तरे मागविण्याबरोबरच महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पदभरतीची माहिती मागविण्यात आली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही यासाठी महापालिकेस पत्र पाठवित याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच, पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिका तसेच नगरपरिषदांच्या अग्निशमन दलात महिलांची नेमणूक करण्याबाबतही सूचना केल्या होत्या.
पुण्यात अग्निशमन दलाचा विस्तार…
पुण्यात अग्निशमन दलाची स्थापना 1888 साली ब्रिटीशांनी केली. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात महापालिकेच्या स्थापनेनंतर म्हणजेच 1950 पर्यंत शहरात दोन अग्निशमन केंद्र होती. तर 1950 नंतर टप्प्याटप्प्याने महापालिकेचा विस्तार झाला तसे अग्निशमन केंद्रांचे कामही वाढत गेले. महापालिकेने या विभागात गरजेपुरती पदे भरली. तर 1990 पासून पुढे 1999, 2002, 2005, 2006 तसेच 2007 मध्ये महापालिकेने या विभागात पदभरती केली. मात्र, कुठेही महिलांना संधी देण्यात आली नाही.
शासनाकडून 2014 सेवा नियमावली मान्य झाली आहे. मात्र, त्यावेळी अग्निशमन दलाच्या नियामवलीस शासनाने मान्यता दिली नाही. जवळपास 8 वर्षांनंतर त्यास मान्यता मिळाली. त्यानंतर ही पालिकेची पहिलीच पदभरती आहे. त्यानुळे समांतर आरक्षण महिलांना देणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीला फायरमन पदांची भरती करून नंतर अधिकारी पदासाठी भरती केली जाईल.
– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे महापालिका
तब्बल 135 वर्षांनंतर महिलांना मिळणार संधी :
सध्याची स्थिती : –
- राज्यात सध्या केवळ मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अग्निशमन दलात महिला कर्मचारी कार्यरत.
- पुणे महापालिकेने स्थापनेपासून अग्निशमन दलात
- कधीही महिलांना संधी दिलेली नव्हती.
- आता पुण्यातील होतकरू तरुणींना
- संधी मिळण्याचा मार्ग मोकळा.
- लोकसंख्येचा विचार करता शहरात सुमारे 72 अग्निशमन केंद्र आवश्यक असताना सद्यस्थितीत केवळ 20 केंद्रच कार्यरत.
- दलासाठी सुमारे साडेनऊशे पदे मंजूर
- असताना केवळ 350 कर्मचारीच कार्यरत.
- उर्वरित पदे रिक्तच.
- सन 2022 मध्ये पालिकेच्या अग्निशमन दलाच्या सेवा प्रवेश नियामवलीस मान्यता मिळाल्याने सुमारे
200 पदे भरली जाणार. - या पदभरतीत तब्बल 135 वर्षांनंतर पहिल्यादांच या विभागात महिला कर्मचारी भरती होणार.