चित्रपट पाहत बस चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) बस चालक चित्रपट पाहत बस चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात चालक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येते. यावरून पीएमपीएमएलचा प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पीएमपीएमएल मार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडी हद्दीत 1700 बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. पीएमपीतून दररोज सुमारे 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपी चालक आणि प्रवासी यांचे वाद हे काही नवीन नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून खासगी वाहन चालक आणि पीएमपी चालक यांच्यात वादचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पीएमपी बसने खासगी वाहन चालकाला धडक दिल्याने हे वाद होत असल्याचे आढळून आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडोओ व्हायरल झाला आहे. यात चालक चक्क कानात हेडफोन घालून डॅश बोर्डवर मोबाईल ठेवून चित्रपट पाहत बस चालवत असल्याचे दिसून येते. तसेच चालक रात्रीच्या वेळेस ही बस चालवत असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी पीएमपीची बस बोपदेव घाटात एका शेतात जावून झाडाला धडकल्याची घटना घडली होती.
यात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताचा तपास केला असता चालक मद्यपान करून बस चालवत असल्याचे उघड झाले होते. यावरुन पीएमपी चालक जर चित्रपट पाहत, मद्यपान करुन वाहन चालवणार असतील तर पीएमपीचा प्रवास सुरक्षित आहे का ? हा प्रश्न उपस्थित होतो.
वाहतूक नियमांचे उल्लंघन
पीएमपी चालक सिंग्नल तोडने, फोनवर बोलत वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. पण, त्यांच्यावर ना वाहतूक पोलिस कारवाई करत ना आरटीओ प्रशासन कारवाई करतात. यामुळे चालक सर्रासपणे वाहतूकीच्या नियमांचे उल्लघन करताना दिसतात.