नवी दिल्ली : पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी आतापर्यंत अमृतपाल सिंहच्या 78 साथीदारांना अटक केली होती. एनआयएने अमृतपालचा फायनॅन्सर दलजित सिंह कलसीसह चार साथीदारांना अटक केली आहे. या आरोपींना डिब्रुगडला नेण्यात येणार आहे.
खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपालचा शोध रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्याला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांनी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी अमृतपालला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याची कार नकोदर येथे उभी असल्याचे आढळून आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचा मोबाईल फोनही याच वाहनात सापडला आहे. पंजाब पोलिसांची वारिस पंजाबचे प्रमुख अमृतपाल सिंह यांच्याविरोधात रविवारीही शोध मोहीम सुरूच आहे. आता पंजाबमध्ये 20 मार्चपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. पंजाबमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता इंटरनेट बंदी आणखी वाढवण्यात आली आहे.
जालंधरचे सीपी केएस चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार की, पोलिसांनी अमृतपाल सिंहचा 20-25 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला, त्यादरम्यान तो पळून जाण्यात यशस्वी झाला. शस्त्रांसह दोन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमृतपालचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार आहे.