बीजिंग – रशिया आणि युक्रेन दरम्यान जर शांतता प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली नाही, तर हे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग यांनी हा इशारा दिला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक पत्रकार परिषदेदरम्यान किन गांग बोलत होते. हे युद्ध एका महत्वाच्या टप्प्यावर पोचल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एकतर शत्रुत्व संपुष्टात येईल, शांतता प्रस्थापित होईल आणि राजकीय तोडग्याकडे वाटचाल होईल किंवा आगीत तेल ओतले जाईल, संकटाची व्याप्ती वाढेल आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशारा किन गांग यांनी दिला.
आता शांत राहण्याची आणि विवेक दाखवून चर्चा करण्याची वेळ आली आहे. सुरक्षिततेबाबत सर्वांनाच जी काळजी वाटते आहे, त्या भावनेचा आदर दाखवण्याची वेळ आली आहे. कारण युरोपात स्थायी शांतता आणि स्थैर्य निर्माण केले जाऊ शकेल, असे देखील ते म्हणाले.
नेमके याच वेळी रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोगन यांनीही अधिक वेगाने आणि त्वेषाने प्रतिहल्ले करण्याचे सूतोवाच केले आहे. बाखमत शहर युक्रेनने पुन्हा ताब्यात घेतल्यामुळे रशियाच्या सैन्याकडून आता आणखीन वेगाने आणि त्वेषाने प्रतिहल्ले केले जातील, असे शोगन म्हणाले होते. त्यामुळे वर्षभर सुरू असलेल्या या युद्धाला नवी धार चढण्याची तिन्हे दिसायला लागली आहेत.