ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्यात काल 7 मजली इमारतीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास तज्ज्ञांकडून केला जाणार आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी आज ही माहिती दिली. या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता 17 इतकी झाली आहे.
या स्फोटामुळे जुन्या ढाक्यातील अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर अक्षरशः एखाद्या भूकंपासारखा हादरला होता. स्फोटामुळे किमान 150 जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्फोटामागील नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. मात्र या इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे साठवलेल्या रसायनांच्या साट्याचा स्फोट झाला असावा, असा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. पोलीस, लष्कर, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाकडून या परिसराची तपासणी केली जाते आहे. त्यांच्या तपासानंतरच स्फोटाचे कारण समजू शकेल. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी बांगलादेशाकडे पुरेसे तज्ज्ञ आहेत, असेही ते म्हणाले.
गृहिणीला 1.79 कोटी रुपये वेतन देण्याचा आदेश; स्पेनमधील न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
या स्फोटाच्या तपासासाठी चार तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. स्फोटामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे ढाका मनपाने ही इमारत धोकादायक घोषित केली आहे. तेथील रहिवासांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.