PUNE BY POLLS – कसबा पोटनिवडणुकीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं होत. ते नाव होत रवींद्र धंगेकर यांचं. धंगेकर यांना काँग्रेसने कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तेव्हाच ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं होत. नगरसेवक म्हणून धंगेकर यांनी केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीच्या निकालातून कसब्याच्या जनतेने रवींद्र धंगेकर यांना दिली. समोर धंगेकर यांचा आव्हान असल्याने ही निवडणूक जड जाणार असल्याचा अंदाज भाजपला आला होता. यामुळेच भाजपने येथे आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र भाजपची प्रचार यंत्रणा, त्याला एकनाथ शिंदे यांचं बळ असतानाही महाविकास आघाडीचे धंगेकर वरचढ ठरले.
धंगेकर यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. यावेळी गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी एक घोषणा दिली ज्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. ही घोषणा आहे, खाऊन खाऊन माजले बोके, रवीभाऊ एकदम ओके. धंगेकर यांच्या विजयानंतर देण्यात आलेल्या या घोषणेचा थेट संबंध काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीशी जोडला जातोय.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर खोक्यांचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. शिंदे समर्थकांचा उल्लेख ‘बोके’ असा देखील करण्यात आला होता. हीच घोषणा आता रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील इतर महापालिका निवडणुकांसह पुणे महापालिका निवडणुकांचे देखील वेध लागले आहेत.
अशात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गट येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कसब्याप्रमाणे एकदिलाने लढल्यास महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप शिवसेनेची डोकेदुखी वाढणार अशी कुजबुज पुण्यात सुरु झाली आहे.