Pune Election – खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे २९ मार्च २०२३ पासून रिक्त झालेल्या पुणे लोकसभा जागेसाठी निवडणूक आयोगाला तातडीने पोटनिवडणूक घेण्यास सांगणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ यावर्षी १६ जून रोजी संपत आहे आणि या टप्प्यावर पोटनिवडणूक निष्फळ ठरेल, असे निवडणूक आयोगाने या संबंधातील सुनावणीच्यावेळी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले होते. त्यांचे हे म्हणणे ग्राह्य मानून पोटनिवडणुकीचा आदेश स्थगित करण्यात आला आहे.
मात्र ही पोटनिवडणूक घेण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. कायद्यानुसार रिक्त झालेल्या जागेवर सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. परंतु भाजपने जाणिवपुर्वक ही निवडणूक लांबणीवर टाकली असा आरोप केला जात आहे.