सातारा – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील चार हजार 799 अंगणवाड्यांपैकी 4 हजार 512 अंगणवाड्यांना टाळे लागले आहे. मागण्या मान्य होणार की आंदोलन आणखी चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, 0 ते 6 वयोगटातील मुलांना चांगली सेवा पुरविण्यासाठी व एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे खासगीकरण थांबविण्यासाठी तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, वाढत्या महागाईप्रमाणेचे सेविका मदतनीस यांची भरीव मानधन वाढ करावी, नवीन आधुनिक सुविधांयुक्त मोबाइल द्यावा, नवीन मोबाइलमध्ये मराठीतून पोषण ट्रॅकर ऍप सुविधा असावी यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. या संपामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना टाळे लागले आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा आणखी किती दिवस बेमदुत उपोषण सुरु राहणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सिटू)जिल्हा कमिटीच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या मांडत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आहार बंद, अंगणवाडी बंद, मोबाईल रिपोर्टिंग बंद, सर्वच अंगणवाड्या बंद ठेवून संपात सहभागी होण्याचे आवाहन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार संपात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या आहेत.