नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव, ओआरएस द्रावणाचे जनक डॉ. दिलीप महालनाबिस, वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी, माजी केंद्रीय मंत्री एस.एम.कृष्णा, ख्यातनाम तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन आणि गणितज्ञ श्रीनिवास वर्धन या सहा जणांना यंदाचा पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. त्याशिवाय, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ गायिका वाणी जयराम, समाजसेविका सुधा मूर्ती, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला आदींना पद्मभूषणने सन्मानित केले जाणार आहे. तर, गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, अभिनेत्री रविना टंडन यांच्यासह 91 जणांना पद्मश्रीने गौरवण्यात येणार आहे.
परशुराम खुने (कला), प्रभाकर मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन माने (सामाजिक क्षेत्र), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण) या महाराष्ट्रातील मान्यवरांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 106 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवले जाईल. मुलायम, महालनाबिस, दोशी, झुनझुनवाला यांना हा सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. एकूण 9 मान्यवरांना पद्मभूषणने गौरवले जाईल. भारतरत्न हा देशातील
सर्वोच्च नागरी सन्मान यावर्षी कुणालाही जाहीर झालेला नाही.
पद्मभूषण पुरस्कार
कुमारमंगलम् बिर्ला, एस. एल. भैरप्पा, सुधा मूर्ती (सामाजिक कार्यकर्त्या), कमलेश डी. पटेल, सुमन कल्याणपूर, दीपक धर, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जियार, कपिल कपूर
महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, गजानन माने, रमेश पतंगे, कुमी वाडिया, परशुराम खुने, रविना टंडन