पुणे -राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची पहिल्या सभेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरुवात झाली. या सभेदरम्यान सर्व विद्यापीठातील शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शैक्षणिक धोरण 2020 अंमलबावणी समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यमाने आयोजित या सुकाणू समितीच्या सभेचा पहिला दिवस दि.23 रोजी पार पडला. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, नॅक कार्यकारणी समिती अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, सिंबायोसिसच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ज्या विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत, त्यांच्याविषयी या सभेत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रत्येक विद्यापीठात शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कोणकोणती पावले उचलली आहेत. त्यांच्या काय अडचणी आहेत, यात प्रत्येक विद्यापीठात अंमलबजावणी समिती स्थापन झाली आहे का, त्याचे काम योग्य प्रकारे सुरू आहे का? आर. डी. कुलकर्णी समितीच्या अहवालानुसार काय कार्यवाही झाली, या सगळ्यांचा आढावा घेण्यात आल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
शैक्षणिक धोरणानिमित्ताने शिक्षण पद्घतीत मुळापासून बदलाची गरज आहे. भारताच्या मूळ शिक्षण पद्धतीचा पुन्हा अवलंब करत विचारांची बैठक तयार करणारा समुदाय तयार करण्याची आता गरज आहे.
– डॉ. भूषण पटवर्धन, अध्यक्ष, “नॅक’ कार्यकारणी समिती
नव्या शैक्षणिक वर्षासाठी तयार राहा ः डॉ. देवळाणकर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या सुकाणू समितीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट करा, प्रत्येक टास्क पूर्ण करा व 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी तयार रहा, असे आवाहन उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित सुकाणू समितीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली. यावेळी आजी-माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय धांडे, विद्यापीठातील अधिष्ठाता उपस्थित होते.