नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अखेर पदावरून हटविण्यात आले आहे. यानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेतले. सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यात चौकशी अहवाल देणार आहे. तोपर्यंत हीच समिती कुस्ती संघटनेचे काम बघणार आहे. चौकशी होईपर्यंत सिंह यांनाही अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आले आहे.
#UmeshYadav । उमेश यादवला मित्राकडूनच 44 लखांचा गंडा; नेमके प्रकरण काय?
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कस्तुपटूंनी लैंगिक अत्याचारासह अनेक आरोप केले होते. याच्या चौकशीसाठी व सिंह यांच्या राजीनाम्यासाठी अव्वल ऑलिंम्पिक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले. तीन दिवस हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट पुढे होती. या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांसोबत मंत्री ठाकूर यांची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.
भारतीय कुस्ती महासंघाने आरोप फेटाळले
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांसह सर्व आरोप भारतीय कुस्ती महासंघाने फेटाळून लावले आहेत. तसेच कुस्तीपटूंचा निषेध हा छुप्या अजेंडामुळे प्रेरित असल्याचे दिसून येते. महासंघात मनमानी आणि गैरव्यवस्थापनाला वाव नाही, असा दावा भारतीय कुस्ती संघाने क्रीडा मंत्रालयाला दिलेल्या खुल्याशात केला आहे.
आयओसीकडूनही समितीची स्थापन
कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या पत्रावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) बैठक बोलावून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ऍथलीट आयोगाच्या अध्यक्षा एम.सी. मेरी कोम यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ब्रिजभूषण यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणार आहे. मेरी कोम व्यतिरिक्त चौकशी समितीत सहदेव यादव, अलकनंदा अशोक, धनुर्धारी डोला बॅनर्जी, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, वकील तलिश राय आणि श्लोक चंद्र यांचा समावेश आहे. ही समिती शनिवारपासून कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांच्याविरोधातील पुराव्यांवर चर्चा करणार आहे.
मी तोंड उघडले तर…
महासंघाचे अध्यक्ष आणि कैसरगंजचे खासदार असणाऱ्या ब्रिजभूषण हे सर्व आरोप बनावट असल्याचे म्हटले आहे. “सगळे खोटे बोलत आहेत आणि हे लोकांनाही माहिती आहे. मी तोंड उघडले तर सुनामी येईल,’ असे लैंगिक आरोपांबाबत बोलताना ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे. मला राजीनामा देण्यास सांगितलेले नसून 24 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. मी उत्तर पाठवीन. मी इथे कोणाच्या दयेवर बसलेलो नाही, मी निवडून आलेला अध्यक्ष आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.