मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल (दि.11) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. यानंतर राज्यभरातून विरोधी पक्ष नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली होती. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला.
दरम्यान, ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईत काही निष्पण्ण न झाल्याचे दिसून आले. यानंतर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ म्हणाले, “तपास यंत्रणेला त्यांनी विचारलेली सर्व माहिती दिली आहे. राजकीय अकसापोटी छापा टाकण्यात आलेला आहे. ईडी अधिकाऱ्यांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आली. सर्वसामान्य जनता जोपर्यंत आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणीही आमचे काही करू शकत नाही. असं नवीद मुश्रीफ यावेळी म्हणाले.
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. यावेळी घराला आणि परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त होता.