मुंबई – गणपती विसर्जनादरम्यान दादर पोलीस ठाणे परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट आपापसात भिडले होते. यावेळी मोठा गोंधळ झाला होता. यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच दोन्हही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आपण गोळीबार केला नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. मात्र आता याप्रकरणी सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल समोर आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला होता. यावेळी पोलीस चौकीबाहेरच दोन्हही गट आपापसात भिडले होते. कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणावाचे वातारण निर्माण झाले होते. सरवणकर यांनी यावेळी गोळी झाडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेऊन 15 सप्टेंबर रोजी आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले होते.
या सर्व प्रकरणाचा बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरवणकर यांच्यावर आता कोणती कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सदा सरवणकर यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.