किव्ह – रशियाच्या हद्दीतल्या हवाई तळापर्यंत घुसलेले युक्रेनचे एक ड्रोन पाडल्याचा दावा रशियाने केला आहे. या हवाई तळावर युक्रेनच्या ड्रोननी या महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. यामुळे रशियाच्या हवाई संरक्षण व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. पाडलेल्या ड्रोनमुळे तळावरील 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
रशियाच्या ईगल हवाई तळावर हा ड्रोन हल्ला झाला होता. या तळावर टीयू-95 आणि टीयू-160 ही अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेली लढाऊ विमाने तैनात असतात. या विमानांनीच गेल्या 10 महिन्यांच्या काळात युक्रेनमध्ये अनेक वेळा हवाई हल्ले केले आहेत.
हे ड्रोन पाडल्यामुळे तळाच्या परिसरात स्फोट झाला आणि आगदेखील लागली होती. मात्र कोणत्याही विमानाचे नुकसान झाले नसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
हल्ल्यासाठी पाठवले गेलेले हे ड्रोन युक्रेनमधूनच नियंत्रित केले जात होते, का रशियाच्या हद्दीतूनच नियंत्रित केले जात होते, हे समजू शकलेले नाही. जर हे ड्रोन युक्रेनमधून पाठवले गेलेले असल्यास या ड्रोनने किमान 600 किलोमीटरचा प्रवास केला असावा.