टोकियो – जपानमध्ये पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये चौथ्या मंत्र्याची गच्छंती करण्यात आली आहे. यामुळे जपानच्या मंत्रिमंडळाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
केनया अकिबा असे राजीनामा दिलेल्या मंत्र्याचे नाव असून त्यांच्याकडे फुकुशिमा आणि अन्य आपत्तीग्रस्त भागाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी होती. राजकीय आणि निवडणुकीच्या निधीमध्ये गैरव्यवहार आणि युनिफिकेशन चर्चबरोबर संदिग्ध वाटतील असे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. या राजकीय नेत्यांबरोबरचे संबंध आणि देणग्यांच्या मुद्यामुळे हे चर्च नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे.
पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आपण राजीनामा देत आहोत. मात्र आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असे केनया अकिबा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. किशिदा यांनी फुकुशिमा फेरनिर्माणाच्या खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्यावर सोपवली आहे.
गेल्या दोन महिन्यात किशिदा यांनी 4 मंत्र्यांना घरी पाठवले आहे. वांशिक अल्पसंख्यांकांबाबत हीन वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री सिओ सुगिता यांच्या जागेवर दुसऱ्या मंत्र्याची नियुक्ती केली गेली. समलिंगी जोडपी अपत्ये जन्माला घालू शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. तसेच संयुक्त राष्ट्राच्या कमिटी मिटींग दरम्यान मध्यमवयीन महिलांच्या वेशभुषेबाबतही त्यांनी हीन वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना हटवण्यात आले होते.
Nepal government : नेपाळमध्ये 3 उपपंतप्रधान; एका टिव्ही अँकरचाही समावेश
युनिफिकेशन चर्चबरोबरच्या संबंधांच्या आरोपामुळे आर्थिक पुनर्निर्माण मंत्री दाईशिरो यामागिवा यांनाही पद सोडावे लागले होते. तर आपल्याला देण्यात आलेली जबाबदारी कमी दर्जाची असल्याचे म्हटल्यामुळे कायदा मंत्री यासुहिरो हनाशी यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.