आळंदी – प्रेयसीसोबत दूर कुठेतरी पळून जाण्यासाठी एका 58 वर्षांच्या वृद्धाने एका व्यक्तीचा खून करुन स्वतःच्याच खुनाचा बनाव रचला. यासाठी त्याने दुसऱ्या एका व्यक्तीचे शिर धडावेगळे केले. खून केलेल्या व्यक्तीला स्वतःचे कपडे घालून मृतदेह रोटर मशीनमध्ये फिरवून मयत व्यक्ती स्वतः आहे असे भासविले. ही घटना 16 डिसेंबर रोजी रात्री चऱ्होली खुर्द येथे घडली.
सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय 58, रा. चऱ्होली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. रवींद्र भिमाजी घेनंद (वय 48) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निखील रविंद्र घेनंद (वय 28, रा. धानोरे, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी याचे एक महिलेसोबत प्रेम संबंध होते. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत दूर कुठेतरी जाऊन राहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्युचा बनाव बनवायचा होता. म्हणून त्याने महिलेसोबत मिळून रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन 16 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. कोयत्याने त्यांचे शिर धडावेगळे केले. रवींद्र घेनंद यांच्या मृतदेहाला सुभाष याने स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतात काम करायच्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून फिरवला.
तो मृतदेह सुभाष याचा असल्याचे समजून आपला अपघाती मृत्यू झाला असल्याचे घरचे समजतील आणि आपल्याला प्रेयसीसोबत कुठेतरी लांब जाऊन राहता येईल, असा बनाव सुभाष याने केला. रवींद्र यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे कपडे, डोके, कोयता लपवून ठेवला. घरच्या मंडळींनी मृत्यू झाल्याचे समजून दहावाही घातला. मात्र नंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी सुभाष याला अटक केली असून पुढील आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डाॅ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, पोलीस निरीक्षक आर. जे . पाटील, उपनिरीक्षक बापूसाहेब जोंधळे, माने, टोके, शेंडे, कुऱ्हे, बांगर, लोणकर, खेडकर, साळूंखे, गर्जे, आडे, पालवे यांनी केली.