नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या मॉर्प केलेल्या फोटोवरून आज विधानभवनात गोंधळ सुरु झाला. यावेळी विरोधकांकडून भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून भुजबळांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या कृतीकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हीअतिशय गंभीर बाब असल्याचे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, यावर राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.