हडपसर – सहकारी चळवळीचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. जनमानसात आपल्या वाटणाऱ्या या सहकारी बँका आधुनिक सोयीद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. तसेच निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना नेहमीच भरभरून मदत करीत आहेत. मुक्त आर्थिक धोरणांमुळे खासगी व व्यापाऱ्या बँका मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत.
या बँकांच्या स्पर्धा सहकारी बँकांना निश्चितपणे जाणवू लागल्या आहेत. या स्पर्धेत ठामपणे उभे राहण्याची मानसिकता आज सहकारी बँकांना गरजेची झाली आहे. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले. येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या वार्षिक सन २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन सहकारी संस्था उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री शिवरकर बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर ,माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बँकेचे चेअरमन सुनिल गायकवाड , व्हाईस चेअरमन भरतलाल धर्मावत, ॲड. प्रभाकर शेवाळे, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत ससाणे, यशवंत साळुंखे, सुदाम जांभूळकर, जयसिंगराव गोधळे , गणेश फुलारे, लक्ष्मण कोद्रे,प्रशांतमामा तुपे, संभाजी हाके, शुभांगी कोद्रे, सोनाली परदेशी, ॲड. विजय राऊत , चंद्रकांत तोंडारे, राजू शिंदे, किशोर शिंदे आदिजण उपस्थित होते.
उपनिबंधक दिगंबर हौसारे म्हणाले की छोट्या छोट्या लोकांना मदत करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम सहकारातील संस्था या करत असतात. सन्मित्र बँकेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यापुढेही बँकेने ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देवून ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सन १९७२ ला बँकेची स्थापना झाली असून आज बँकेला ५० वर्ष झाली आहेत.
२६३ कोटींच्या ठेवी आहेत, १५८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे , बँकेच्या उत्तम कामकाजाला १७ बक्षिसे मिळाली आहेत. सतत ऑडिट वर्ग ‘ अ ‘ बँकेला मिळत असून १०० लोकांचे कुटुंब म्हणून बँक चांगले काम करत आहे. असे चेअरमन सुनिल गायकवाड यांनी आपल्या प्रासताविकात सांगितले.संचालक गणेश फुलारे यांनी सूत्रसंचालन केले. तर , व्हाईस चेअरमन भरतलाल धर्मावत यांनी आभार मानले.