हडपसर – लोकांमध्ये विश्वास निर्माण करून ठेवी मिळविणे, हे खऱ्या अर्थाने सहकारी बॅंकेचे यश आहे. बॅंकेत ठेवी या तेथे काम करणाऱ्या लोकांकडे पाहून ठेवल्या जातात. सन्मित्र बॅंकेच्या आजच्या ठेवी पाहाता, येथील कामकाज पारदर्शी सुरू आहे, हेच लक्षात येते. सन्मित्र बॅंक ही माझी बॅंक आहे. या बॅंकेचा मला अभिमान आहे. असे मत जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते यांनी व्यक्त केले.
येथील सन्मित्र सहकारी बॅंकेच्या वार्षिक सन 2021 दिनदर्शिकेचे प्रकाशन ऍड. मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, बॅंकेचे चेअरमन सुनील गायकवाड, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत ससाणे, यशवंत साळुंखे, सुदाम जांभूळकर, जयसिंगराव गोधळे, लक्ष्मण कोद्रे, संभाजी हाके, दिलीप टकले, शुभांगी कोद्रे, रेश्मा हिंगणे, ऍड. विजय राऊत, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने आदी उपस्थित होते.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, “सन्मित्र बॅंकेचे कामकाज पारदर्शी सुरू आहे. अनेजण बॅंकेचे कामकाज हे कासवगतीने सुरू असल्याचे बोलतात, परंतु कासव – ससा शर्यतीत कासवच जिंकते, तर ससा हा आराम करतो. याचाच अर्थ बॅंक योग्य काळजी घेत प्रगती करत आहे. करोनाचा काळ असतानाही बॅंकेने चांगले काम केले आहे, हे कौतकास्पद आहे.’
“सन 1972 ला बॅंकेची स्थापना झाली असून आज बॅंकेला 48 वर्ष झाली आहेत.222 कोटींच्या ठेवी आहेत, 141 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बॅंकेच्या उत्तम कामकाजाला 11 बक्षिसे मिळाली आहेत. सतत ऑडिट वर्ग ‘अ’ बॅंकेला मिळत असून 100 लोकांचे कुटुंब म्हणून बॅंक चांगले काम करत आहे, असे चेअरमन सुनील गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
ही दिनदर्शिका सर्व सभासदांना व खातेदारांना घरपोच मोफत वाटप करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने यांनी सांगितले.