हडपसर – महापालिकेत जी अकरा गावे समाविष्ट करण्यात आली आहेत ती अकरा गावे आणि हवेलीतील उर्वरित भाग एकत्र करून नवीन महापालिका स्थापन केली तर तो निर्णय सगळ्यांच्या हिताचा ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा अर्धवट निर्णय घेण्यापेक्षा हडपसर सह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली आहे.
हडपसर स्वतंत्र महानगरपालिका कराच !
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी यापूर्वी ही वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट करताना हडपसर ही स्वतंत्र महापालिका असावी अशीच मागणी कायम ठेवली आहे. आता यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शिवरकर यांनी म्हटले आहे की फुरसुंगी, देवाची उरळी, उरळी कांचन, वडकी, वाघोली, केसनंद, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, लोणी कंद, कात्रजच्या
सर्व वाडया व उंड्री, पिसोळी, वडाची वाडी, औताड वाडी, हांडे वाडी, ईत्यादी सर्व भाग एकत्र करुन त्याची स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास या सर्व भागाचा सुनियोजित विकास होऊ शकेल.
हा सगळा भाग मोठ्या लोकवस्तीने गजबजला आहे. तेथे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची गरज आहे. पुणे महापालिकेत हा भाग समाविष्ट केल्याने किंवा यातील केवळ दोन गावे बाजूला काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याने या भागाचा प्रभावीपणे विकास होऊ शकत नाही. त्यामुळे वरील सूचनेचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी आणि या भागाच्या सुनियोजित विकासाला हातभार लावावा असेही शिवरकर यांनी या पत्रात म्हटले आहे.