पुणे – शहरात जानेवारीत जी-20 परिषद होत आहे. त्याच्या बैठका सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहेत. परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधिंना लोहगाव विमानतळ ते राजभवन या रस्त्यावरून ने-आण केली जाईल. मात्र, या रस्त्यांवर समस्यांचा डोंगर असल्याचे महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे.
अतिक्रमणे, राडारोडा, अनधिकृत जाहिरात फलक, चौकांमध्ये अस्वच्छता, सार्वजनिक भिंतीची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्या आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यावर नेहमी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असल्याने फक्त दुरुस्तीसाठी महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतरही रस्त्याची अवस्था बिकट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, येत्या 20 डिसेंबरपर्यंत महापालिका आयुक्तांनी हा रस्ता दुरूस्त करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरिएट हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी पथ, विद्युत, प्रकल्प, अतिक्रमण, घनकचरा, पीएमआरडीए आणि क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. 10 किलोमीटरच्या अंतरावर प्रमुख चौकांची पाहणी आयुक्तांनी केली. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाहणीत आढळलेल्या समस्या
विमातळाबाहेर पडताच एअरपोर्ट जंक्शन येथे अस्वच्छता. खासगी जागेत पडलेला राडारोडा, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत, रस्त्यावर जागोजागी पार्किंग रस्ता अनेक ठिकाणी असमतोल. बहुतांश भागात खड्डे विकफिल्ड चौक येथेही राडारोडा, रस्ता व पादचारी मार्गावर गवत, अतिक्रमणे. येरवडा कारागृहाच्या भिंतीची दुरवस्था, कचरा पादचारी मार्गांवर अतिक्रमण, दुरवस्था, खराब झालेले पीएमपी बसथांबे गोल्फ चौक, गुंजन टॉकीज चौक, पर्णकुटी चौक, मंगलदास रस्ता, जहॉंगीर रुग्णालय रस्ता, आरटीओ, शिमला ऑफिस चौक, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्त्यावरही अनेक ठिकाणी अनधिकृत केबलचे जाळे, रस्त्यावरच जाहिरातीचे होर्डिंग, अनधिकृत फ्लेक्स