पिंपरी, दि. 29 – बेकायदेशीरपणे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत तक्रार दिली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ (वय 45), यांनी सोमवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रा. भंडारकर रोड, शिवाजीनगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीला राज्यात कोणत्याही प्रकारचे बाइक टॅक्सी सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात आलेली नाही. तरी देखील कंपनीने ऑनलाइन ऍप सुरू करून त्याद्वारे दुचाकी प्रवासी वाहतूक सुरू केली. ही वाहतूक अधिकृत असल्याचे चालकांना व प्रवाशांना भासविण्यात आले. याबाबत संबंधित कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.