मनिला, (फिलीपाईन्स) – फिलीपाईन्समध्ये आलेल्या नलागुई वादळामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान 50 जण ठार झाले आहेत. ( At least 50 dead as Tropical Storm Nalgae lashes Philippines) देशाच्या दक्षिणेकडील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथे किमान 60 गावकरी बेपत्ता झाले आहेत.
भूस्खलन झाल्यामुळे अनेक जण चिखलाखाली गाडले गेले असल्याची भीती निर्माण झाली आहे. मागुइदानाओ प्रांतात गुरुवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 42 जण वाहून गेले आहेत, असे देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तर अन्य प्रांतांमध्ये 8 जण वाहून गेले असल्याची माहिती मिळते आहे.
नलागुई वादळ फिलीपाईन्सच्या पूर्वेकडील कमारीन सूर प्रांतात शनिवारी थडकले होते. त्यानंतर आजूबाजूच्या प्रांतांमध्ये मुसळदार पावसाला सुरुवात झाली. मात्र मागुइदानाओ प्रांतातील कुसिओंग गावावर भूस्खलन झाले.
दरडी कोसळल्यामुळे या गावातील 60 जण गाडले गेले आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये बहुसंख्य लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनामुळे 5 हेक्टरवरील शेतजमीन नष्ट झाली आहे.