मनिला, (फिलिपाईन्स) – दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्सच्या जहाजांवर चीनच्या जहाजांकडून पाण्याचे फवारे मारले जाण्यावर फिलिपाईन्सने जोरदार आगपाखड केली आहे. चीनच्या तटरक्षक दलांच्या जहाजांकडून पाण्याचे फवारे मारल्यामुळे आपल्या जहाजांवरील ३ खलाशी जखमी झाल्याचे फिलिपाईन्सने म्हटले आहे.
या संदर्भातील तक्रार नोंदवण्यासाठी फिलिपाईन्सने चीनच्या उच्चायुक्तांना सोमवारी पाचारण केले होते. चीनच्या आक्रमक कृतीविरोधात कठोर शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे, असे फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रातील सेकंड थॉमस शोएल जवळ फिलिपाईन्सच्या जहाजांवर चीनच्या तटरक्षक दलांनी पाण्याचे फवारे मारले होते. म्हणून फिलिपाईन्सने हा निषेध नोंदवला आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी ४ मे रोजी चिनी तटरक्षक दलांच्या जहाजांनी केलेल्या पाण्याच्या फवाऱ्यांच्या माऱ्यात उनाईझाह जहाजाची हानी झाली होती. तशीच दुसरी सागरी चकमक शनिवारी देखील झाली होती. चीनच्या तटचरक्षक दलाच्या जहाजांकडून सातत्याने दक्षिण चीन समुद्रामध्ये अन्य देशांच्या जहाजांना अटकाव केला जात असल्याच्या पार्श्वभुमीवर फिलिपाईन्सने ही आगपाखड केली आहे.
चीनकडून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा सांगितला जातो आहे. फिलिपाईन्ससह अन्य देशांकडून या सागरी मार्गाचा वापर करण्यास चीनकडून नेहमीच आडकाठी केली जात असते. जर फिलिपाऩ्सच्या जहाजांनी दक्षिण चीन समुद्राचा वापर करणे थांबवले नाही, तर चीनला ठोस कारवाई करायला लागेल अशी धमकी देखील चीनने दिली आहे. चीनच्या या धमकीची दखल अमेरिकेने देखील घेतली आहे.