नवी दिल्ली – भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र पहारेदार हे विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज सोमवारी फिलिपाइन्समध्ये दाखल झाले. आसियान प्रदेशातील सागरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हे जहाज फिलिपाईन्सला तैनात करण्यात आले आहे.
फिलीपीन्स कोस्ट गार्ड बरोबर द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याचा देखील यामागे उद्देश आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हे जहाज २५ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत आसियान देशांमध्ये फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि ब्रुनेई येथे परदेशात तैनात असणार आहे.
आसियान देशांमधील परदेशातील तैनातीचा भाग म्हणून सलग तिसऱ्यांदा भारतीय तटरक्षक दलाने आपले जहाज पाठवले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून २०२३ च्या सुरुवातीला, आयसीजी प्रदूषण नियंत्रण जहाजांनी कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियाला भेट दिली होती.
या तैनातीदरम्यान हे जहाज मनिला (फिलीपिन्स), हो ची मिन्ह (व्हिएतनाम), आणि मुआरा (ब्रुनेई) या बंदरांना भेट देणार आहे. हे जहाज विशेष सागरी प्रदूषण नियंत्रण उपकरणांनी सज्ज असून समुद्रात सांडलेले तेल पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आणि ऑपरेशनची एकंदर व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे जहाज बंदरांना भेट देतेवेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रदूषण प्रतिसाद प्रशिक्षण आणि विविध उपकरणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन करणार आहे.
याव्यतिरिक्त, या जहाजावर सरकारच्या पुनीत सागर अभियान या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि भागीदार राष्ट्रांशी समन्वय साधून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी. राष्ट्रीय छत्रसेनेतील २५ छात्रसैनिक देखील सहभागी झाले आहेत.
फिलीपीन्स तटरक्षक, व्हिएतनाम तटरक्षक आणि ब्रुनेई सागरी संस्था यांसारख्या प्रमुख सागरी संस्थांसोबत द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी या जहाजाचा दौरा महत्वपूर्ण आहे .