पुणे – चांदणी चौकातील जुना उड्डाणपुल पाडण्यापूर्वी शनिवारी (दि. 1) रात्री 11 वाजता या चौकातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पुल पाडण्यासाठी आवश्यक यंत्रणा व्यवस्थित झाली आहे की नाही? याची पाहणी करून खात्री झाल्यावरच रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान ब्लास्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील अर्धा तासाता तेथील परिस्थिती निअयंत्रणात आल्यावर सुरक्षिततेची खात्री करून राडारोडा उचलण्याच्या कामाला सुरवात होईल.
या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणकडून बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस दलातर्फे 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.