दौंड तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण : यंदा समीकरणे बदलणार का?भाऊ ठाकूर
राहू – राज्यात बाजार समितीचे पडघम वाजत असतानाच दौंड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दौंड तालुक्यात बाजार समिती निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल किंवा माजी आमदार रमेश थोरात यांचीच चलती असते. इतर कोणाचाही प्रभाव तालुका मान्य करीत नाही. याची परिणीती आत्तापर्यंतच्या निवडणुकांवरून आली आहे.त्यामुळे बाजार समिती ही आमदार राहुल कुल किंवा माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडेच राहणार हे निश्चित. सध्या बाजार समितीवर माजी आमदार रमेश थोरत यांचे वर्चस्व आहे. विशेषतः सोसायटी मतदार संघावर माजी आमदार रमेश थोरतांचे विशेष वर्चस्व आहे.
मागील काळात झालेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये देखील माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु सरासरी विचार केला तर आमदार कुल समर्थकांच्या निवडून आलेल्या सोसायट्यांची संख्या निश्चितच वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे आमदार कुल यांनी आपली ताकद पणाला लावल्यास चित्र काही प्रमाणात बदलू शकते. तसेच ग्रामपंचायतीतही आमदार कुल यांना निश्चितच चांगले यश मिळू शकते.
सोसायट्यांप्रमाणेच मागील काळात जवळ जवळ ऐंशी टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्या वेळेस आमदार व माजी आमदार यांनी आपल्याकडे जास्त ग्रामपंचायती असल्याचा दावा केला होता. परंतु याला उत्तर म्हणून आमदार कुल यांनी मेळावा घेऊन आपणाकडे जास्त ग्रामपंचायती असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे आगामी काळातील बाजार समिती तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप उभारी घेणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे थोरात गट आपली मोर्चेबांधणी करण्यासाठी सरसावला असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे कुल गटाने आपले पक्के बस्तान बसवण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दौंडच्या सहकारात कोण घेणार भरारी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दौंडच्या सहकारभूमीत थोरातांचेच वर्चस्व
दौंड तालुक्यातील सहकारी निवडणुकांचा इतिहास पहिला तर जास्तीत सहकारी संस्था या माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडेच आहेत. गेली पस्तीस ते चाळीस वर्षे ते जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. प्रदीर्घ काळ अध्यक्ष ही राहिलेले आहेत इतर सहकारी संस्था या त्यांच्या ताब्यात आहेत. तालुक्यातील सोसायट्यांवर त्यांचे विशेष वर्चस्व आहे तसेच बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, देखरेख संघ, यावर त्यांचे वर्चस्व आहे.