पिंपरी, दि. 27 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण समितीच्या मंजुरीसाठी शहरातील विविध विकास कामांचे विषय येत असतात. हे विषय मंजूर करण्यासाठी येताना अर्धवट माहितीने येतात. आता अर्धवअ माहितीवर काम होणार नाही, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले असून आठ विषयांच्या मंजुरीला ब्रेक लावला आहे.
अजेंड्यावर विषय येताना त्या विषयाची संपूर्ण माहिती, निविदा कधी प्रसिध्द केली, किती जणांनी सहभाग घेतला? फेरनिविदा केली का? मुदतवाढ दिली आहे का? खर्चाचा व्यवस्थित तपशील अशी सविस्तर माहितीसह विषय सादर करा. जेणेकरून विषयाची इत्यभूंत माहिती मिळेल, यासाठी अजेंड्याच्या फॉरमॅटमध्ये बदल करा, असा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नगरसचिव आणि सर्व विभागांना दिला. आयुक्तांच्या या आदेशामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ठरलेल्या एकाच “फॉरमॅट”मधील अजेंड्यामध्ये बदल होणार आहे.
प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मंगळवार (दि.27) रोजी बैठक झाली. या बैठकीत सुमारे 17 कोटींच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली.
महापालिकेतील नगरसेवकांचा 12 मार्च रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असून आयुक्तच प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर सिंह यांनी सर्व विभाग प्रमुखांना फाईलवर अभिप्राय देण्याचे बंधनकारक केले आहे. जेणेकरून संबंधित विषयासंबंधी विभाग प्रमुखांचे मत आयुक्तांना त्वरीत कळेल. गेल्या अनेक वर्षांपासून मोजक्या शब्दात आणि अर्धवट माहितीसह स्थायी आणि सर्वसाधारण सभेसमोर येणाऱ्या विषयाबाबत सिंह यांनी महत्वाचा आदेश दिला आहे. अजेंड्यावर विषय येताना त्या विषयाची संपूर्ण माहिती, निविदा कधी प्रसिध्द केली, किती जणांनी सहभाग घेतला? फेरनिविदा केली का? खर्चाचा व्यवस्थित तपशील, निविदा रक्कमेपेक्षा किती कमी दराने निविदा आहे? यासह विषयाची इत्भूंत माहिती अजेंड्याच्या “फॉरमॅट”मध्ये बदल करून सादर करा, असा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे.
अर्धवट माहितीमुळे 8 विषयांचा निर्णय नाही
मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांच्या मंजुरीसाठी 21 विषय अजेंड्यावर होते. 13 विषयांची व्यवस्थित माहिती आयुक्तांना मिळाली. मात्र, 8 विषयांची अर्धवट माहिती असल्याने हे विषय आयुक्तांनी फेटाळले आहेत. या विषयांची सविस्तर माहिती सादर केल्यानंतरच मंजूर केले जातील, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.
गोलगोल उत्तरे देऊ नका, योग्य माहिती द्या
शहरात कोणत्या भागात ड्रेनेजचे पाणी थेट नदीत सोडले जाते, अशी काही आकडेवारी आहे का? याबाबत जलःनिसारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांना आयुक्त सिंह यांनी विचारले. मात्र, तांबे यांनी योग्य ती माहिती न देता गोलगोल उत्तरे देत होते. यावरून सिंह यांनी गोलगोल उत्तरे देऊ नका, योग्य ती माहिती द्या, अशी सूचना केली. तसेच शहरात थेट नदीत ड्रेनजचे पाणी सोडणाऱ्या जागांचा सर्व्हे करण्याच्या सूचनाही आयुक्त सिंह यांनी दिल्या.