भोरच्या नगराध्यक्षा कॉंग्रेसच्याच पुरस्कर्त्या : बॅनरबाजीमुळे सिद्ध
भोर – भोर शहरातील विकासकामांच्या भूमिपूजनांवरून नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीत नगराध्याक्षा पक्षांतराचे वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे यांचे फोटो नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा बॅनरवर प्रसिद्ध करून पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भोर नगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीची पाहणी करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे थेट नगराध्यक्षांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आवारे यांच्या निवासस्थानासमोर फटाक्यांची आतशबाजी केली होती. त्यामुळे भोर शहरात नको त्या चर्चांना उधाण आले होते.
तसेच आमदार संग्राम थोपटे, राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे यांच्या उपस्थितीत भोर शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि गौरी सजावट स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले; परंतु नगरसेवक, नगराध्यक्षांमध्ये या कार्यक्रमावरून नाराजीनाट्य घडले होते. नगराध्यक्षा अनुपस्थित नाराजी दर्शवली होती. शहरातील विरोधकांनी या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो नगराध्यक्षांच्या बॅनरमुळे निष्फळ ठरला असल्याची चर्चा भोरच्या राजकीय गोटात रंगली आहे.
“नगराध्यक्षा निर्मला आवारे या कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्याबरोबर काही नगरसेवकांचे असलेले मतभेद दूर केले जातील. भोर शहराचा कायापालट होत असताना नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरसेविका यांचा समन्वय असावा यासाठी पक्ष निश्चित पुढाकार घेईल.”
– संग्राम थोपटे, आमदार
“आम्ही कॉंग्रेसचेच खंदे समर्थक असून पक्षांतराचा कधीच विचारही करत नसून, पक्षांतराच्या चर्चा निराधार आहेत.”
– निर्मला आवारे, नगराध्यक्षा, भोर