पाथर्डी – श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर पारंपरिक पद्धतीने देवीच्या जयघोषात घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. देवस्थान समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व नीता गोसावी यांच्या हस्ते सपत्नीक मुख्य धार्मिक विधी पार पडला.
याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, प्रविण पाटील उपस्थित होते. मोहटे गावात विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे, भिमराव पालवे, अजिनाथ आव्हाड, अशोक भगवान दहिफळे, अशोक विक्रम दहिफळे यांच्याहस्ते महाआरती केल्यानंतर सुवर्ण अलंकाराने सजलेल्या देवीच्या मुखवट्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, टिपऱ्या पथक सहभागी झाले होते.
साडेतीन शक्ती श्री क्षेत्र माहूरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे. चौसष्ट योगिनी अष्ट भैरव दश महाविद्याच्या मूर्ती श्री यंत्राकार दर्शन रांगेत स्थापित असून असे स्थान राज्यात एकमेव आहे. वेदशास्त्र संपन्न नारायण सुलाखे, भूषण साकरे यांनी पौरोहित्य केले. प्रांधिकारी देवदत्त केकाण, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी देवीची दर्शन घेतले.
घटस्थापनेच्या दिवशी मोहटा गावातून देवीचा सोन्याचा मुकुट (तांदळा) वाजगाजत मोहटा गडावर येतो. गडावर गेल्यावर देवीच्या स्वयंभू मूर्तीवरती सोन्याचा मुकुट (तांदळा) चढवला जातो. देवीला साडी नेसवली जाते. त्यानंतर सोन्याचे दागिने चढवले जातात. सोन्याचा टोप चढवला जातो. देवीच्या नाकात नथ, विविध प्रकारचे सोन्याचे आभूषण देवीला घातले जातात. त्यामुळे देवीचे वेगळे रूप नवरात्रीमध्ये भक्तांना पहावयास मिळते.
येणाऱ्या भक्तांसाठी देवस्थान समितीकडून सर्व सोयासुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवरात्रीच्या कालावधीत दररोज धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मोहटा देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नवरात्र उत्सव काळासाठी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.