बंगळुरू – कर्नाटक कॉंग्रेसने त्यांच्या पे सीएम पोस्टर्सवर अखिल अय्यर नावाच्या एका अभिनेत्याचे छायाचित्र छापले आहे. आपली पूर्वसंमती न घेताच हे फोटो घेण्यात आल्याचा आरोप करत कॉंग्रेसविरूध्द कारवाईचा इशारा या अभिनेत्याने दिला आहे.
कॉंग्रेसने कर्नाटकातील बसवराज बोम्मई सरकारविरूध्द आक्रमक प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांची छायाचित्रे असलेली पे सीएम पोस्टर्स बंगळुरू शहरात सगळीकडे लावण्यात आली आहेत. सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात कोणत्याही कंत्राटाच्या मोबदल्यात 40 टक्के कमिशन मागितले जाते असे आरोप भाजप सरकारवर आहेत. त्या अनुशंगाने कॉंग्रेसने हे पे सीएम 40 टक्के सरकारा पोस्टर छापले आहेत. यातील एका पोस्टरवर अखिल अय्यरचे छायाचित्र असून तुम्ही बधिर आहात का अशा आशयचा मजकुर त्यावर अखिलच्या फोटोखाली टाकण्यात आला आहे.
मात्र या कॅंपेनशी आपला काहीएक संबंध नसताना आणि आपली परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हे पोस्टर छापण्यात आले असून आपण त्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अखिलने म्हटले आहे. अखिलने याबाबतची पोस्ट टाकली असून त्यात राहुल गांधी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना टॅग केले आहे. त्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी त्याने केली आहे.