लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळच्या सुमारास आग लागली असूनआग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत १३ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
हॉटेलमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशमन दलाच्या बचावकार्यात अडथळा येत आहे. यामुळेच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी खिडक्या फोडत आहेत. काही लोक जखमी झाल्याची माहितीही मिळत आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक गाड्या उपस्थित आहेत.
सकाळी ६ वाजता ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. धूर झाल्याने हॉटेलमधील अनेकांचा जीव गुदरमत होता. आतमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्याचे मोठं आव्हान अग्निशन दलासमोर होते.
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या काहीजणांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.