नवी दिल्ली – कॉंग्रेसने दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततांवरून सत्तारूढ आपवरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना भ्रष्टाचारासाठी भारतरत्न मिळणे शक्य आहे, अशी खिल्ली कॉंग्रेसने उडवली आहे.
दिल्ली सरकारचे धोरण केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहे. त्याप्रकरणी सीबीआयने नुकताच सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. त्यानंतर कॉंग्रेसने आपविरोधात निदर्शने केली. कॉंग्रेसच्या त्या कृतीबद्दल काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत कॉंग्रेसने आपला घेरण्याची रणनीती कायम ठेवली आहे. दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपवर पुन्हा निशाणा साधला.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सिसोदिया यांना भारतरत्नने सन्मानित केले जायला हवे, अशी भूमिका मांडत केजरीवाल त्यांच्या सहकाऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्या भूमिकेचा संदर्भ घेऊन चौधरी यांनी भारतरत्नबाबतची टिप्पणी केली. केजरीवाल आणि कंपनीने प्रामाणिकपणा, पारदर्शकता ते भ्रष्टाचार असा प्रवास अतिशय कमी कालावधीत केला आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.