पुणे – पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत कर्णधार के. एच. प्रज्वल आणि सचिन भार्गो यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तेलुगु योद्धाज संघाने मुंबई खिलाडीज संघाला 12 गुणांच्या फरकाने पराभूत करून गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रज्वलने कर्णधाराला साजेशी खेळी करताना 3 मिनिटे 1 सेकंद संरक्षण केले, तर भार्गोने अष्टपैलू कामगिरी बजावताना आक्रमणात 10 गुण व संरक्षणात 3 मिनिटे 47 सेकंद अशी कामगिरी केल्यामुळे तेलुगु योद्धाज संघाला मुंबई खिलाडीज संघावर 55-43 असा विजय मिळवता आला. रोहन शिंगाडे आणि आदर्श मोहिते यांनी अनुक्रमे 11 आणि 9 गुणांची कमाई करताना तेलुगु योद्धाजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मुंबई खिलाडीज संघाकडून या मौसमातील सर्वोत्तम संरक्षक दुर्वेश साळुंखे याने पहिल्या डावातील 2 मिनिटांसाह एकूण 5 मिनिटे 11 सेकंद संरक्षण करतानाच आक्रमणात 6 गुण नोंदवून कडवी झुंज दिली. अविक सिंग याने 8 गुणांची कमाई करताना त्याला उत्तम साथ दिली. मात्र, ही जोडी मुंबईचा पराभव टाळू शकली नाही.
या विजयाबरोबच तेलुगु योद्धाज संघाने गुजरात जयंट्स संघाला (10 गुण) मागे टाकून 12 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. त्याआधी राजस्थान वॉरियर्सवर दणदणीत विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या तेलुगु योद्धाज संघाने वेगवान आक्रमण करताना मुंबई संघाचे 10 खेळाडू झटपट बाद करून पहिल्या पाच मिनिटांअखेर 26-00, अशी आघाडी घेतली. भार्गोने 10 गडी बाद करताना त्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पुढच्या डावात अवधूत पटेलने 2 मिनिटे 46 सेकंद तर अरुण गुंकी याने नाबाद 2 मिनिटे संरक्षण करताना तेलगु योद्धाजची आघाडी 28-20 अशी कायम राखली.
पुढच्या सात मिनिटांत दुर्वेश साळुंखेने आटोकाट प्रयत्न करूनही तेलुगु योद्धाजची आघाडी कायम राहिली. साळुंखेने 3 मिनिटे 11 सेकंद संरक्षण करून मुंबईला 4 बोनस गुण मिळवून दिले. त्यामुळे तेलुगु योद्धाजची आघाडी 23 गुणांवर रोखली गेली. अखेरच्या डावात प्रज्वलने 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ संरक्षण करताना तेलुगु योद्धाजच्या 55-43 अशा विजयाची निश्चिती केली.