पणजी : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडून गोव्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याची बातमी अलीकडेच आली होती. त्याला मुंबई संघात खेळण्याची फारशी संधी न मिळाल्याचे त्यामागचे कारण मानले जात होते. रविवारी अर्जुनने अनेक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्या, ज्यावरून असे दिसून आले की त्याने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण सुविधेत प्रशिक्षण सुरू केले आहे.
अर्जुनने अद्याप रणजी पदार्पण केलेले नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत तो मुंबईकडून फक्त 2 सामने खेळला आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन बॅटिंग करताना दिसत आहे. आगामी देशांतर्गत हंगामाच्या तयारीत तो व्यस्त आहे.
अर्जुन इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. फ्रँचायझीने त्याला मेगा लिलावात पुन्हा एकदा करारबद्द केले होते. गत मोसमात मुंबईची कामगिरी अत्यंत खराब होती, असे असतानाही अर्जुनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी अर्जुनचा राज्याच्या हंगामपूर्व संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश होण्याची अपेक्षा असल्याची माहिती दिली आहे. लोटलीकर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्ही डावखुरा गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही हंगामपूर्व चाचणी सामने खेळू आणि अर्जुन त्या सामन्यांमध्ये खेळेल. निवडकर्ते त्यांच्या कामगिरीच्या आधारे निर्णय घेतील.