नेवासा – तालुक्यातील देवगाव परिसरात छापा टाकून नेवासा पोलीसांनी ४ लाख ३६ हणार ८० रुपये किंमतीचा अवैध बियरचा साठा जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तालुक्यातील देवगांव येथील महेश दारकुंडे याचे राहते घराचे समोर पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारुचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले आहेत. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, राहुल यादव, गणेश ईथापे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी महेश दारकुंडे याचे राहते घराचे समोर असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी कासवर्ग कंपनीच्या बिअरचे एकुण १५८ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये १२ बॉटल अशा वर्णनाचा एकुण ४ लाख ३६ हणार ८० रुपये किंमतीच्या बियरच्या बॉटल मिळुन आल्याने सदरचे बॉक्स पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करुन नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
याप्रकरणी महेश दारकुंडे (रा.देवगाव) याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलिस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलिस कर्मचारी राहुल यादव, गणेश ईथापे यांनी केली.