सातारा – शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली आहे. मंगळवारी राजभवनामध्ये शपथविधी सोहळ्यामध्ये शंभूराज देसाई यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिपदासह साताऱ्याचे पालकमंत्री पद सुद्धा त्यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. कॅबिनेटचे ग्रामविकास किंवा सार्वजनिक बांधकाम या दोन खात्यांपैकी कुठल्यातरी एका खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या राजकीय घडामोडींमध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली, किंबहुना त्यांना बंडासाठी मानसिक दृष्ट्या तयार करण्यामध्येच देसाई यांचा मोठा वाटा राहिला आहे. शिंदे गट आणि भाजपच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शंभूराज देसाई यांची पहिल्या रांगेत वर्णी लागणार हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देसाई यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संधी देऊन आपला शब्द खरा केला.
राजभावनामध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे नऊ व एकनाथ शिंदे गटाचे नऊ मंत्र्यांचा समावेश होता.या यादीत पाटणचे आमदार शंभूराजे यांनी सतराव्या क्रमांकावर मंत्री पदाची शपथ घेतली. साताऱ्यात शंभूराज देशाई यांच्या समर्थकांनी त्यांच्या पोवई नाक्यावरील कोयनादौलत निवास स्थानासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर पाटण तालुक्यात त्यांच्या मूळ गावीसुद्धा देसाई समर्थकांनी साखर वाटून आणि फटाक्यांची आतीषबाजी करत आनंद व्यक्त केला. हिंदू हृदयसम्राट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणार असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.