मुंबई – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलाच संघर्ष सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना कोणाची यासोबतच आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यासोबतच निवडणूक आयोग शिवसेना पक्षाबाबत काय निर्णय देणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच आता शिवसेनेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
विधानपरिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेकडे विरोधीपक्षनेते पद येताच औरंगाबादचे अंबादास दानवे यांना विरोधीपक्ष नेता करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
विधानपरिषदेमध्ये जास्त संख्याबळ हे सेनेकडे असल्यामुळे त्यांनी विरोधीपक्षनेते पदावर दावा केला होता आणि तो मान्य करण्यात आला आहे. राज्यात सत्तानाट्य घडल्यानंतर विधानसभेत अजित पवार विरोधीपक्षनेते झाले होते. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदी दानवे यांची वर्णी लागली आहे.