येरवडा, दि.3 (प्रतिनिधी) – येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. मुख्य रस्त्यावर असलेल्या या इमारतीची दुर्दशा झाली आहे.मागील पाच वर्षाच प्रभागाच्या अवतीभवतीच्या भिंती रंगविण्यापेक्षा क्षेत्रीय कार्यालयाची स्वत:ची इमारत उभी करता आली असती. चेंबर्सचे झाकण, खड्डयांची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती, वीजेच्या खांबाला करंट लागणे आहे, ड्रेनेज, कचरा, पाणी, स्वच्छता, प्रभागातील शाळांची दुरवस्था वारंवार तक्रारी करुनही अधिकारी दाद देत नाहीत, कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतात अशा अनेक तक्रारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी केल्या.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त वौभव कडलख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. यावेळी अनेक सदस्यांनी तक्रारी
मांडल्या. प्रभागातील पालिकेच्या शाळांमध्ये मुलभुत सुविधा नसणे, स्ट्रॅक्चरल ऑडिट, फायर ऑडिट नसणे यावर कमिटीच्या सदस्यांनी आपले तीव्र मत मांडले. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 75 समाजमंदिरे आहेत त्यातील फक्त 3 क्षेत्रीय कार्यालयाच्या ताब्यात आहेत.
इतर समाजमंदिरे ही माननीयांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात असूनही समाज मंदिरे भाड्याने नागरिकांना वापरण्यास देण्यात येतात. तेथे अनेक प्रकारचे क्लासेस घेऊन त्यांच्याकडुन 5 हजार भाडे घेतले जाते. ती पालिकेने ताब्यात घ्यावीत जेणेकरुन प्रभागाला मिळालेला निधी वाढवून मिळेल, अशी सुचना सामाजिक कार्यकर्ते प्रताप मोहिते यांनी केली. नवी खडकीतील शाळेची दुरवस्था झालेली आहे. त्याबद्दल अनेक निवेदने दिली. मुंबईत एखाद्या इमारतीला आग लागल्यावर इतर इमारतीचे ऑडीट केले जाते, तसे येथील इमारत पडल्यावर आपण करणार का? एखादी दुर्घटना घडण्याची आपण वाट पाहत आहात का?
असा खडा सवाल त्यांनी विचारला. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छ ऍप दिले आहे. मात्र, या ऍपमध्ये कोणतीच माहिती दिली जात नाही इतर क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी ऍप व्यवस्थीत भरतात येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना याचे कोडे का? असा सवालही विकास सोनवणे यांनी विचारला. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक बेकायदा अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज लावलेली आहेत त्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही.यावरही प्रश्न विचारले गेले.