प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 – “प्रत्येकाने आपल्या प्रवासाची सुरवात विसरता कामा नये. वकिलांनी कामात सातत्य ठेवले पाहिजे, धीराने व चिकाटीने वकील व्यवसाय करायला हवा. सध्या सोशल मीडियाच्या काळात न्यायव्यवस्थेला पिंजऱ्यात उभे करणे सोपे झाले आहे.
न्यायव्यवस्थेला मालिन करण्याचे प्रयत्न समाजातल्या काही स्तरांतून केले जात आहे. न्यायव्यवस्थेला मालिन होऊ न देणे ही न्यायाधीश व वकील या दोन्ही घटकांची जबाबदारी आहे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी व्यक्त केले.
पुणे बार असोसिएशन तर्फे वकीलांसाठी जिल्हा न्यायलय येथे “ज्युडीशियल कोलोकिया’ या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प अशोका हॉल येथे उच्च न्यायालयाचे न्या. मारणे यांच्या व्याख्यानाने पार पडले.
न्या. मारणे हे पुणे बार असोसिएशनचे माजी सदस्य आहेत. त्यांची नुकतीच न्यायमूर्ती म्हणून निवड झाल्याबद्दल पुणे बार असोसिएशनतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ व पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विष्णुपंत मारणे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश क्र. 1 एस. जे. भारुका आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे उपस्थित होते.
भारुका म्हणाले, “न्यायमूर्ती मारणे यांची वकिलीची सुरवात याच बार असोसिएशनमध्ये केली आणि न्यायाधीश म्हणून आपल्या हक्काच्या बार असो.मध्ये येणे ही भावना सुखकारी आहे. ते कार्यक्षम असून न्यायव्यवस्थेला त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असून ते नक्कीच अत्यंत प्रभावीपणे काम करतील.
ऍड. पांडुरंग थोरवे म्हणाले, “ज्युडीशियल कोलोकियाच्या माध्यमातून वकील बांधवांना विविध कायदेशीर विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायमूर्ती मारणे यांचे कारकीर्द प्रेरणादायी असून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यात नक्कीच अनेक वकील बांधव हे न्यायधीश म्हणून रुजू होतील.
सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे सचिव ऍड. अमोल शितोळे, तर आभार ऍड. शिल्पा कदम-बिराजदार यांनी मानले. सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील सेक्रेटरी – ऍड. सुरेखा भोसले, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, व कार्यकारिणी सदस्य – ऍड. काजल कवडे, ऍड. सई देशमुख, ऍड. अर्चिता जोशी, ऍड. मजहर मुजावर, ऍड. अमोल भोरडे, ऍड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर, ऍड. तेजस दंडागव्हाळ,ऍड. कुणाल अहिर , ऍड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.