कोल्हापूर – राज्याला आदर्श घालून देणारी कौतुकास्पद घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत घडली आहे, कारण या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. तातोबा बाबूराव हांडे असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवकाचे नाव आहे. आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने त्यांना हा हांडे यांना हा बहुमान दिला आहे. वाजत गाजत आणि कोल्हापुरी फेटे घालून अनोख्या पद्धतीने स्वागतही करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बहुमत असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री तृतीयपंथी सुद्धा होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. मात्र प्रत्यक्षात राजकारणात असे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले नाही. राजकारणामध्ये नेहमीच तृतीयपंथी यांना संघर्ष करावा लागला आहे. मात्र संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत घडली आहे, कारण या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. तातोबा बाबूराव हांडे असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवकाचे नाव आहे.
विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारक निर्णय घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने राज्यासमोर आदर्श घालून दिला होता. यानंतर इतर व्यक्तीप्रमाणे तृतीयपंथीयांनाही सन्मानाने जगता यावे तसेच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातच राजकारणातही तृतीयपंथीयाना स्थान देवून कोल्हापुरातील हुपरी नगरपरिषदेने राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे.
तृतीय पंथीयास प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान आमदार प्रकाश आवाडे प्रणीत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने मिळवून दिला आहे.
ताराराणी आघाडीचे तत्कालीन स्वीकृत नगरसेवक प्रकाश बावचे यांनी पदाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्यामुळे या पदावर निवड होण्यासाठी आज नगरपरिषद सभागृहात खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. आवाडे गटातर्फे या पदावर आपली निवड व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या इतर इच्छुकांची नावे बाजूला करत ताराराणीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी संपूर्ण परिसरात देव आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या तातोबा हांडे यांच्या नावास पसंती दर्शवली.
पहिल्या निवडणुकीत काही त्रुटींमुळे अर्ज अवैध
तातोबा बाबूराव हांडे ऊर्फ देव आई असे त्यांचे नाव आहे. तातोबा हांडे ऊर्फ देव आई रेणुका भक्त म्हणून ओळखले जातात. परिसरात त्यांचा मोठा भक्तगण आहे. त्यांनी नगरपरिषदेची पहिली निवडणूक ताराराणी आघाडीकडून लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र कागद पत्रातील काही त्रुटींमुळे त्यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला होता. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी तातोबा हांडे उर्फ देवी आई यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला होता त्याची आज आवाडे यांनी पूर्तता केली.