नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यात बार असल्याचा आरोप आणि त्यावर कॉंग्रेसने केलेल्या टीकेला इराणी यांनी उत्तर दिले आहे. आपली मुलगी 18 वर्षांची असून कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते आहे, असे नमूद करत ती कोणताही बार चालवत नसल्याचा दावा त्यांनी केला.
इराणी यांची मुलगी गोव्यात अवैधपणे एक बार चालवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. गोव्याच्या असगाव येथील सिली सोल्स नामक रेस्टॉरंटशी संबंधित हे प्रकरण आहे. याबाबत बोलताना इराणींच्या मुलीचे वकिल कीर्त नागरा म्हणाले की त्यांच्या आशील ना तर बारच्या मालक आहेत ना त्या तो बार चालवतात. त्यांना आतापर्यंत कोणती कारणे दाखवा नोटीसही आलेली नाही.
इराणींचा कॉंग्रेसवर निशाणा
याबाबत बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पुन्हा अमेठीतून उभे राहावे. यावेळीही ते पराभूत होतील. मी न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात न्या मागेन. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जी देशाची पाच हजार कोटींची लूट केली आहे, त्याबाबत मी पत्रकार परिषद घेतली हीच माझ्या मुलीची चूक आहे.
बार कोणाचा ते सगळ्यांना माहिती
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना गोव्यातील एक वकिल आयर्स रॉड्रिक्स म्हणाले की, सिली सोल्स कॅफे आणि बार इराणी यांच्या कुटुंबीयांकडून चालवला जातो हे अख्ख्या गोव्याला माहिती आहे. त्याचे पुरेसे पुरावेही आहेत आणि एक्साइज कमिशनरने त्यांना नोटीसही पाठवली आहे. आता 29 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तेव्हा मालक कोण आहे हेही तेव्हा स्पष्ट होईल. इराणी कुटुंबाची गोव्यात अन्यही बरीच संपत्ती असल्याची माहिती समोर आली असल्याचा दावा करत या सगळ्याची ईडीने चौकशी करावी.