बामको, (माली) – मालीची राजधानी बामकोच्या जवळ असलेल्या काटी या लष्करी तळावर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. मालीच्या संसदेत ही माहिती देण्यात आली. मालीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून कट्टरवाद्यांनी उद्छाद मांडला आहे. मात्र या काळात काटी येथील लष्करी तळावर प्रथमच दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सफोटकांनी भरलेल्या दोन वाहनांनी या लष्करी तळावर स्फोट घडवून आणला. दहशतवाद्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.
लष्करी तळावरील सुरक्षा सक्षकांनी दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला त्वरित प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या प्रचंड धुमश्चक्रीमध्ये 7 दहशतवादी ठार झाले आणि 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, असे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.
दहशतवाद्यांच्या एका गटाने तळाचे प्रवेशद्वार स्फोटाने उडवून दिले आणि नंतर तळाच्या आत बॉम्ब फेकण्यात आले. तर दुसऱ्या गटाने तळाच्या आवारात घुसून तेथील वाहनांना आगी लावण्यास सुरुवात केली. तळाच्या आवारातील दोन लष्करी वाहनेही या दहशतवाद्यांनी चोरून नेली. एका अन्य हल्ल्यामध्ये जिहादींनी बामाको पासून 60 किलोमीटर अंतरावरील एका पोलीस तळावरही हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक ठेर झाले.
मालीमध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांचे प्राबल्य वाढायला लागले आहे. आतापर्यंत उत्तरेकडे सक्रिय असलेले अल-कायदा संलग्न जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमिन संघटनेचे दहशतवादी आता मध्य मालीमध्ये सक्रिय झाले आहेत. काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही जिहादी गटाने घेतलेली नाही.