बारामतीत राष्ट्रवादी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
बारामती/ जळोची – येथील नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत जुन्या तसेच नवीन चेहऱ्यांना संधी देणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बारामतीत झालेल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवेल, अशी घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सर्वांनाच उमेदवारी देणे अशक्य आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यांनी वेगळी भूमिका न घेता सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. आगामी बारामती नगरपालिका, माळेगाव नगरपंचायत तसेच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर, सचिन सातव, किरण गुजर, बाळासाहेब तावरे, संदीप जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, नगरपालिकेला संधी देताना काही नवीन चेहरे तर काही जुने अनुभवी चेहरे अशा पद्धतीने मिलाफ करून नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. कोणी आश्वासन दिली तरी त्यांच्याकडे न जाता पक्षाकडे रितसर उमेदवारीसाठी अर्ज करा, सर्व अर्जांचा विचार करून अंतिम निर्णय घेईल. नगरपालिकेसाठी प्रचार करताना कार्यकर्त्यांनी पातळी सोडून प्रचार करू नये, वैयक्तिक स्वरूपाची टीका करू नये, सर्वांना विश्वासात घेऊन ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे.
बारामतीकरांनीही गेल्या पाच वर्षांत झालेला विकास जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे नगर परिषदेची ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहोत. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असेल याची खात्री आहे. मात्र, सर्वांनाच संधी देणे शक्य होणार नाही. तरीही इतर ठिकाणी तसेच स्वीकृत नगरसेवकपदी इच्छुकांना संधी देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली.
माळेगावची निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर
निवडणूक सुरू झाल्यानंतर अनेकजण लूज स्टेटमेंट करतात, अशा पद्धतीचे उद्योग कुणीही करू नयेत, बारामतीत घडणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत येत असतात. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व जागा निवडून आल्या पाहिजेत, एकाही जागेवर पराभव होता कामा नये. सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्या संचालक व पदाधिकाऱ्यांनी सर्व निवडणुकीत सक्रिय मदत करावी. माळेगाव नगरपंचायत देखील राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असल्याची घोषणा पवार यांनी केली.